Wednesday, April 17, 2019

दूरस्थ फेबुमित्राची भेट

  आपण अनेकदा अनोळखी नावे असलेल्या अपरिचित व्यक्तीशी सोशल मिडियाद्वारे जोडले जातो. त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेले नसते. त्यांचे खरे रुप काय असेल याची आपणांस काडीचीही कल्पना नसते तरी देखील सोशल मिडियावर त्यांचे जे लिखाण वाचनात येते त्यावरून ती व्यक्ती कशी असेल याचे काल्पनिक चित्र मनात तयार होते व मनाच्या आणि मतांच्या / विचारांच्या तारा जुळल्या की आपण फेबुवर त्याचे मित्र बनतो.
    अशाच प्रकारे पुणे आणि आसपासच्या परिसरात रहाणारे माझे काही फेबुमित्र आहेत. सोशल मिडियाद्वारे यांच्यांशी विचारांचे आदान प्रदान घडत गेले व मैत्री दृढ़ होत गेली. या सर्व लोकांना प्रत्यक्ष एकदा तरी भेटायला हवे असे नेहमीच वाटत आले होते आणि ती संधी मिळाली. काही कामा निमित्त पुणे मुक्कामी १५ / २० दिवस रहायला जाण्याचा योग आला. पुण्यात गेल्यावर या सर्वांना भेटायचेच हे ठरवून सर्वांना मी पुण्यात येत असल्याचे कळविले व भेटीची इच्छा प्रकट केली. त्या सर्वांनी सहर्ष प्रतिसाद दिला, पुण्यात कुठे रहाणार याचीही आस्थेने चौकशी केली. ( इथेही पुणेरी वृत्ती डोकावलीच ! पुणे / मुंबईचा माणूस तुम्ही कुठे रहाणार याची आधी चौकशी करतो आणि उलट कोंकणी माणूस आपल्या घरीच रहायला या असे आग्रहाने सांगतो )
    त्यांपैकी एक फेबुमित्र जे सातत्याने मराठीतून ललित लेखन करणारे,  प्रथित यश संपादन केलेले लेखक श्री. विजय तरवडे यांची प्रथम भेट पुणे मुक्कामी घेतली. कारण सर्वात आधी प्रतिसाद आला तो श्री. विजय तरवडे यांचा ! मात्र एका भीषण अपघातात सांपडल्याने आपण अंथरुणावर खिळून असल्याचे त्यांनी सांगितले आणि मला धक्काच बसला. महाराष्ट्र व बेळगावी येथून प्रसिद्ध होणार्या अनेक मराठी दैनिकातून ते सातत्याने नर्म विनोदी स्फूट लेखन करीत आले आहेत. त्यांच्या लेखनाची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अगदी कॉलेज जीवनापासूनच त्यांचे ललित लेखन चालू आहे. अनेक थोर लेखक संपादक यांच्याशी त्यांची मैत्री आहे. फेबुवरच्या त्यांच्या पोस्टस् विचारपूर्वक टाकलेल्या असतात म्हणूनच त्यांच्याशी मैत्री जुळली. मध्यंतरी त्यांनी एका चित्रपटा विषयी आपला नकारात्मक अभिप्राय फेबुवर टाकला होता त्यावर मी " माझे तुम्ही ३०० रु. वाचवलेत " अशी गंमतीनं प्रतिक्रिया दिली तर महाशयांनी त्वरित पुणेरी बाणा दाखवला व आपली ३००रु. किंतीची पुस्तकें विकत घ्या अशी फेर प्रतिक्रिया तेवढ्याच गंमतीनं दिली आणि मी त्यांच्या कडून ती पुस्तकें विकतही घेतली देखील शिवाय आमचे एक माजी संपादक मित्र श्री. सुरेश वाळवे यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ' उडत उडत ' हे परदेश भ्रमंतीचे प्रवास वर्णन करणारे पुस्तक त्यांना भेटी दाखल पाठविले.
    तसे आपण फेबुवर अनेक मित्र जोडतो पण प्रत्यक्षात ते कसे असतात कसे वागतात हे  आपणांस माहीत नसते. तेच जाणून घ्यायची उत्सुकता होती. म्हणूनच पुण्यातील फेबुमित्रांना भेटायची उत्सुकता होती. भेटीची वेळ ठरवली. तरवडे यांनी आपला पत्ता कळवला आणि त्याप्रमाणे ओला गाडीने अगदी त्यांच्या बंगल्यापाशी मला सोडले. माझी चाहूल लागताच तरवडे यांच्या चिमुकल्या गोड नातीने - उर्वीने दरवाजा उघडला. दिवाणखान्यातच लेखक महाशय शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखे आपादमस्तक घायाळ अवस्थेत पडलेले होते. एवढी भीषण अवस्था त्यांची झालेली असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. फेब्रुवारी महिन्यात कुणा नातेवाईकाच्या विवाहा निमित्त ते मुंबईला गेले होते व दादर चौकातून चालत जात असतांना पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने त्यांना ज़ोरदार धक्का देऊन उडवले होते. गाडी केव्हांच पसार झाली पण आजुबाजूच्या तरुणांनी धांव घेतली, सभोवार आपापल्या दुचाक्या गोलाकार लाऊन वाहतुक थांबवली, पोलीस एंब्युलन्स बोलावली व बेशुद्ध पडलेल्या तरवडे यांना नजिकच्या हिंदुजा इस्पीतळात दाखल केले. तिथून पुढे पुणे येथील दीनानाथ मंगेशकर इस्पीतळ ! गेले दोन महिने ते अंथरुणावर एका स्थितीत पडून आहेत ! डोक्यापासून पाया पर्यंतच्या अनेक जखमा अजून भरून यायच्या आहेत. एक पाय अजून दुमडता येत नाही किंवा हालवता येत नाही. रोज डॉक्टर घरी येतात, उपचार करतात. शरीर घायाळ असले तरी मन उल्हसित आहे. वाग्देवी खणखणीत आहे. बोलण्यात कुठे निराशेचा स्वर नाही. आणखी दोन महिन्यात आपण पूर्ण बरे होऊ व पुन:श्च लेखन कार्याला जुंपून घेऊ हा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चहापान झाले. लौकर बरे व्हा आणि परिवारसह अवश्य गोव्याला या, तुमच्या आवडीचे मत्सभोजन देऊ आणि गोव्यातील सुंदर सागर किनारे व वैभवशाली मंदिरे दाखवू असे मी त्यांना आमंत्रण देऊन जड अंत:कारणाने त्यांच्या बंगल्याच्या पायर्या उतरलो. मागे वळूचा पाहिले तेव्हा त्यांची चिमुकली नात उर्वी आपले चिमुकले हात हालवून मला निरोप देत होती.

ज. अ. रेडकर.
पिंपरी- पुणे
०९६२३३५३१६९